एनसीबीचे पुन्हा एकदा अर्जुन राजपालला समन्स


मुंबई – बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याला एनसीबीने पुन्हा समन्स बजावले आहे. अर्जुन रामपालची एनसीबी सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत चौकशी करणार आहे. आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर अर्जुन रामपाल हजर राहण्याची शक्यता आहे.

अर्जुन रामपालने मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे असल्याचे म्हणाला होता. माझा ड्रग्जशी काही संबंध नाही. पण या प्रकरणात एनसीबी जे काम करत आहे ते बरोबर आहे. एनसीबी चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये एनसीबीलाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे पुढे रामपाल म्हणाला होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने यापूर्वी माध्यमांसमोर सांगितले होते की, एनसीबीने अर्जुन रामपालचा परदेशी मित्र पॉल गायार्ड याला अटक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गायार्डला एनसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यापूर्वी एनसीबीने रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रायडिस हिच्याकडे सलग दोन दिवस चौकशी केली.

तपास यंत्रणेने ९ नोव्हेंबर रोजी छापा टाकताना अर्जुन रामपालच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅबलेटसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले आणि अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी केली. एनसीबीने रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला अटक केली होती. जुहू येथील फिरोज यांच्या निवासस्थानी गांजा असल्याचे आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी गैब्रिएला डेमेट्रायडिसचा भाऊ अ‍ॅगिसिओसच्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्ज सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात, एनसीबीने नशेच्या प्रकरणात गैब्रिएलाचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रिएडसला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून अटक केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.