हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा


पुणे: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व इषा झा यांच्या विरोधात औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार अमन अजय चड्डा (वय २८ , रा. भाऊ पाटील रोड, पुणे. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार चड्डा यांचे आई आणि वडील हे दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. हर्षवर्धन यांनी त्यावेळी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडल्यामुळे अपघात झाला.

चड्डा यांच्या वडिलांनी त्याबाबत हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी आपले हार्टचे ऑपरेशन झाले असल्याचेही जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील संगनमत करून आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. चड्डा यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.