नव्या प्रकारच्या कोरोनामुळे ब्रिटनमधील बाधितांच्या संख्येत वाढ


लंडन: जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आली आहे. पण, जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गडद होण्याची चिन्हे आहेत. कारण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ब्रिटनमध्ये वर्तवण्यात आली असून त्यानुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमधील बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली असून लॉकडाउन लागू केला आहे.

याबाबतची माहिती संसदेत ब्रिटन सरकारने दिली. हाउस ऑफ कॉमन्समध्ये आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले की, कोरोनाबाधितांची संख्या लंडन आणि आजूबाजूच्या परिसरात सात दिवसांमध्ये दुप्पट झाली असल्यामुळे तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लंडन आणि जवळपासच्या परिसरात तिसऱ्या पातळीवरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जवळपास पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

हँकॉक यांनी पुढे सांगितले की, नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची ओळख ब्रिटनमध्ये पटली आहे. कोरोना इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व भागात वेगाने फैलावण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. प्राथमिक संशोधनात कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार सध्याच्या विषाणूपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून एक हजार बाधितांना सध्या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू मुख्यत: दक्षिण इंग्लंडमध्ये अधिक वेगाने फैलावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.

त्याचबरोबर दर सात दिवसांनी राजधानीमध्ये बाधितांची संख्या दुप्पट होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत २३ डिसेंबर रोजी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.