अल्पसंख्याक युवक व महिलांना कौशल्य प्रशिक्षण: नबाब मलिक


मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यवसाय आणि उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार आहे. यंदा पहिल्या टप्प्यात ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील १५ ते ४५ वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट, हेल्थ केअर, बांधकाम, लॉजिस्टीक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया (असिस्टंट कॅमेरामन), ऑटोमोबाईल, मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल, रोड रोलर ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय, स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण ३०० ते ६०० तासांचे असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थांची निवड लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ही प्रशिक्षणे सुरु करण्यात येतील. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे, असे मलिक यांनी सांगितले.

प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशिक्षणसंस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सील यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.