पुण्यात उद्या पाळला जाणार ‘No Horn’ दिवस


पुणे – पुण्याचे ज्या पद्धतीने आकारमान वाढत आहे, त्याचप्रमाणे लोकसंख्या देखील वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे पुण्यात वाहतुक समस्या, वायु प्रदुषण, ध्वनी प्रदुषण या समस्या डोकेवर काढत आहेत. तसेच पुण्यात दुचाकी वाहनांसोबत चार चाकी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यामुळे गाड्यांच्या हॉर्नचा सातत्याने मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. घाईत असताना रस्ता लवकरात लवकर पार करुन निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी गाड्यांचे हॉर्न सतत वाजवले जातात. ज्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा धोका निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात उद्या ‘नो हॉर्न’ दिवस पाळला जाणार आहे. पुण्यातील गाड्यांच्या हॉर्नला उद्या (12 डिसेंबर) एक दिवस विश्रांती दिली जाणार आहे.

सर्वाधिक हॉर्नचा वापर पुण्यात केला जातो, असे निदर्शनास आले आहे. पुणेकरांना छोट्या रस्त्यांमुळे आणि रहदारीमुळे वाहतुकीच्या समस्यांना दररोज सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत भविष्यात निर्माण होणा-या समस्यांना आळा घालण्यासाठी उद्या ‘नो हॉर्न’ दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागातर्फे एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.

प्रातिनिधिक स्वरूपात टिळक चौक येथे शनिवारी दुपारी बारा वाजता जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले, डॉ.राजेश देशपांडे, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे उपस्थित राहणार आहेत.