भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक


कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भाजपध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही नेते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. जे पी नड्डा २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

जे. पी. नड्डा यांच्यासह कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ कैलाश विजयवर्गीय यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.


जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती बंगाल पोलिसांना देण्यात आली होती. पण बंगाल पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी पोलिसांसमोर आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप दिलीप घोष यांनी केला होता. यानंतर पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाने सविस्तर अहवाल मागवला होता.

तृणमूल काँग्रेसकडून भाजपने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी म्हटले की, भाजपचे गुंडच हिंसाचार करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हा सर्वसामान्यांचा निषेध असल्याचे ते म्हणाले आहेत. दुसरीकडे टीएमसीचे नेते हकीम यांनी भाजप बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचा आरोप केला आहे.