mRNA लसीच्या चाचणीला भारतात पहिल्यांदाच परवानगी


नवी दिल्ली – ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) mRNA टेक्निकवर आधारित भारतातील पहिल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या फेज एक आणि दोनच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली आहे. HGCO19 ही लस जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केली आहे. ही परवानगी काही अटींवर देण्यात आली आहे. अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनसोबत मिळून पुणे स्थित जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स mRNA टेक्निकवर आधारित लस विकसित करत आहे.

काही अटींवर भारताच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या शिफारशीनंतर लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने फेज १ आणि २ च्या मानवी चाचणीला परवानगी मिळावी, यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर समितीने बैठकीत चर्चा केली. एसईसीने विश्लेषण केल्यानंतर डीसीजीआयने क्लिनिकल चाचण्यांना मंजुरी दिली.

समितीने सविस्तर चर्चा केल्यानंतर फेज १ आणि २ च्या चाचण्यांना परवानगी देण्यासाठी शिफारस केली. दुसऱ्या फेजमध्ये जाण्याआधी पहिल्या फेजचा रिपोर्ट सादर करावा लागेल, असे SEC च्या शिफारशींमध्ये म्हटले आहे. बायोटेक्नोलॉजी खात्याने जीनोव्हाच्या mRNA लसीसाठी निधीचा पुरवठा केला. mRNA तंत्रावर आधारी कोरोना लसीची अमेरिकेतील मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही कंपन्यांनी निर्मिती केली आहे.

ब्रिटन आणि कॅनडामध्ये फायझरच्या लसीला मान्यता मिळाली. फायझरने आपातकालीन वापरासाठी भारतातही परवानगी मागितली आहे. फायझरच्या लशीला अतिथंड तापमानात स्टोअर करावे लागते, तशा पद्धतीच्या सुविधा भारतात मोठया प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ही लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.