आम्हाला मत दिले याचा अर्थ तुम्ही आम्हा नेत्यांना विकत घेतले असा होत नाही – साध्वी प्रज्ञा


भोपाळ – बुधवारी भोपाळमधील व्यापाऱ्यांना भर सभेत भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खडे बोल सुनावले. आम्हाला मत दिले याचा अर्थ तुम्ही आम्हा नेत्यांना विकत घेतले असा होत नाही, अशा तिखट शब्दांमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. लोकप्रतिनिधींचे विकास कामे करणे हे असले तरी यासंदर्भात तुम्ही सुद्धा जागृक राहणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांसमोर प्रज्ञा ठाकूर यांनी केलेले हे भाषण ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही थोडा धक्काच बसला.

भोपाळमधील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला साध्वी प्रज्ञा या आल्या होत्या. प्रज्ञा ठाकूर यांनी यावेळी मंचावर गेल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या व्यापाऱ्यांनाच सुनावले. आम्हाला मतदान करुन तुम्ही लोक विकत घेत नाही हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. विकास कामे करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. यासंदर्भात तुम्ही लोकांनाही जागरुक राहण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यामुळेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. यासंदर्भात तुम्ही जागृक नसल्याने विकासकाम होत नसल्याचे म्हणत प्रज्ञा ठाकूर यांनी व्यापाऱ्यांचे कान टोचले.

व्यापाऱ्यांना सल्ला देताना प्रज्ञा ठाकूर यांनी तुम्ही जागरुक राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. व्यापारी जागरुक असले तर त्यांचा विकासकामांमध्ये जास्त सहभाग असल्याचे मतही प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केले. प्रज्ञा ठाकूर यांनी अशाप्रकारे व्यापाऱ्यांना थेट सभेमध्ये सुनावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारे भर सभेमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. अनेकदा प्रज्ञा ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्त्यांमुळेच चर्चेत असतात.