सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास नकार


नवी दिल्ली – राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी एक धक्का मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. त्यातच आज न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार दिला आहे. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यामुळे मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारी वकिलांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना विविध उदाहरणे देऊन मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. पण या प्रकरणात सध्या कोणतीही सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. मराठा आरक्षणाचे प्रकरण हे गंभीर आणि मोठे असल्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

दरम्यान अॅड. मुकूल रोहतगी यांनी न्यायालयासमोर मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे आणि नोकर भरतीबाबत होत असलेल्या नुकसानीचा विषय उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने कोणतीही भरती थांबविण्याता निकाल आम्ही दिलेला नाही. पण ही भरती मराठा आरक्षणानुसार करता येणार नसल्याचे म्हटले आहे.