‘या’ अॅपच्या माध्यमातून करु शकता कोरोना लसीसाठी नोंदणी


भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाला सुरुवात होणार असून तत्पूर्वी आपातकालीन लसीच्या वापरासाठी देशातील तीन कंपन्यांनी केंद्र सरकारकडे परवानगी अर्ज केले आहेत. दरम्यान ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात झाली असल्यामुळे लवकरच भारतातही लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. ही लस आता कशी दिली जाणार, यासाठी कोण कोण लाभार्थी असणार, त्याचे टप्पे, वितरण आदीचा आराखडा बनवण्याचे सुरु असतानाच लसीकरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सरकारने अशावेळी लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले असून जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे.

Co-WIN असे या अ‍ॅपचे नाव असून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. पण हे अ‍ॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्यामुळे ते तुम्हाला डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे दुसरे अ‍ॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. या अ‍ॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा केंद्र सरकार लवकरच करणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या अ‍ॅपबाबतची माहिती दिली आहे.

लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती को-विन अ‍ॅपमध्ये दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. या अ‍ॅपद्वारे ग्रामपंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी अर्ज करू शकणार आहे.

तीन टप्प्यांमध्ये भारतात लसीकरण केले जाईल. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी असे दोन टप्पे आहेत. याची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकारांना देण्य़ात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लस ही गंभीर आजारांशी लढणाऱ्या लोकांना दिली जाणार आहे. Co-WIN अ‍ॅपवर या सर्वांची नोंदणी होणार आहे.

पाच टप्प्यांमध्ये को विन अ‍ॅप विभागले गेले आहे. प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लसीकरण, लाभ स्वीकृती मॉड्यूल, रिपोर्ट अशी पाच मॉड्यूल यामध्ये आहेत. रिपोर्टद्वारे लाभार्थीला आणि देणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे. याची माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे.