हनुमान मंदिरासाठी मुस्लीम व्यक्तीने दिली ८० लाखांची जमीन


बंगळुरू: एका हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येथील एका मुस्लीम व्यावसायिकाने आपल्या जमिनीचा तुकडा देणगी म्हणून दिला आहे. सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून देणाऱ्या या व्यक्तीवर समाजमाध्यमातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे

कडुगोडी परिसरात राहणारे एच एम जी बाशा यांनी अंजनेय स्वामी (हनुमान) मंदिरासाठी बंगळुरू होस्कोटे महामार्गावरील आपली जमीन देणगी म्हणून प्रदान केली आहे. ६५ वर्षीय बाशा यांचा ‘कार्गो’चा व्यवसाय आहे. वेलागेरेपुरा या ठिकाणी त्यांच्या मालकीची ३ एकर जमीन आहे. या जमिनीला लागूनच अंजनेय स्वामी मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम काही भक्तांनी हाती घेतले. मात्र, त्यांना देणग्या मिळण्यास अडचण येत असल्याचे लक्षात येताच भाषा यांनी आपली जमीन देवस्थानच्या ट्रस्टला प्रदान केली.

सहा महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. या मंदिरात भक्तांना विशेषतः महिला भक्तांना प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी जागेअभावी अडचणी येत असल्याचे आपण पाहत आलो आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत मागण्यासाठी देवस्थानाचे विश्वस्त आपल्याकडे आले तेव्हा आपण आनंदाने मंदिरासाठी जमीन देण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे ही जमीन देवस्थानाला दिली असल्याचे बाशा सांगतात.