कोरोना लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही; सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी दिली माहिती


नवी दिल्ली – एकीकडे अमेरिकेची मॉर्डना आणि फायझरची कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्यासाठी सज्ज झालेली असतानाच दूसरीकडे आता भारतीयांना देखील स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भारतातील कोरोना लसीकरणाबद्दल आढावा बैठक घेतली आहे. त्यांनी भारतीयांना त्यावेळेस मोठी दिलासादायक माहिती दिली आहे.

तज्ञांच्या मते, कोरोना प्रतिबंधक लसीसाठी फार वाट पहावी लागणार नाही. त्याचबरोबर ती लस येत्या काही आठवड्यांमध्ये तयार असेल. त्याला वैज्ञानिकांनी हिरवा कंदील देताच भारतामध्ये लसीकरणाला सुरूवात होईल अशी माहिती मोदींनी दिली आहे.

दरम्यान आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांशी लढणार्‍या वयोवृद्धांना कोरोना लसीकरणामध्ये प्राधान्य असेल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. भारतीय संशोधकांना कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल आत्मविश्वास आहे. सध्या सार्‍या जगाचे भारताकडे लक्ष आहे. ते स्वस्त आणि सुरक्षित लस यांची वाट पाहत असल्यामुळे साहाजिकच त्यांचं भारताकडे लक्ष असेल असेदेखील, ते म्हणाले आहेत.

3 स्वदेशी लसींच्या मानवी चाचण्यांचे भारतामध्ये काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्या सुरू असून त्या अंतिम टप्प्यांत आहेत. मोदींनी या तिन्ही लसींच्या निर्मितीमध्ये सहभागी असणार्‍या संस्थांना मागील आठवड्यात भेटी दिल्या आहेत. प्रामुख्याने पुण्यात सीरम इन्सिट्युट कोव्हिशिल्ड, भारत बायोटेक आयसीएमआर सोबत कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिला ही फार्मा कंपनी देखील लस बनवण्याचे काम करत आहे.