दिलदारपणा; रणजितसिंह डिसले बक्षीसाची निम्मी रक्कम यांच्यासोबत घेणार वाटून


मुंबई – महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची काल शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्‍या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रणजितसिंह डिसले यांनी एवढा मानाचा पुरस्कार जिंकल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवत त्यांच्यासोबत अंतिम फेरीत असलेल्या 10 फायनलिस्टसोबत बक्षीसाची निम्मी रक्कम शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजितसिंह यांना 1 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 7 कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्याकडून ग्लोबल टीचर हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षकांची नावे विचाराधीन होती. त्यामध्ये भारताच्या आणि महाराष्ट्रातील सुपुत्राने बाजी मारली आहे. रणजित यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका भारतीयाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचबरोबर टीचर इनोव्हेशन फंडसाठी ग्लोबल टीचर पुरस्काराची निम्मी रक्कम वापरणार असल्याचे डिसले यांनी सांगितले आहे. त्यामुळे भारतासोबतच इतर देशातील शिक्षण आणि शिक्षकांचा स्तर सुधारेल. तेथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत होणार आहे.

स्थानिक पातळीवरदेखील रणजीत यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. ते मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांसोबत जोडले गेले आहेत. शिक्षण विकास मंचच्या 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या “उपक्रम: वेचक-वेधक” या पुस्तकात रणजितसिंह डिसले यांचा “स्वयंशिस्तीतून आरोग्याच्या सवयी” आणि याच पुस्तकाच्या 2015 च्या सुधारित आवृत्तीत त्यांचा “पालक आणि सोशल मीडिया” हा लेख प्रकाशित झाला होता.