भारतातूनच पसरला करोना- चीनच्या चोराच्या उलट्या बोंबा

फोटो साभार द वीक

करोना विषाणू प्रसारामुळे सर्व जगाच्या टीकेचा धनी झालेल्या चीनने चोराच्या उलट्या बोंबा म्हणीचा प्रत्यय आणून दिला आहे. चीनी अकादमी ऑफ सायन्स मधील वैद्यानिकांच्या एका चमूने करोना भारतात २०१९ च्या उन्हाळ्यात उगम पावला आणि तेथून चीनच्या वुहान मध्ये आला असा जावई शोध लावला आहे. करोना प्रसाराबाबत चीन ने यापूर्वीही अनेक वेळा भ्रम निर्माण करणारी विधाने सातत्याने केली असून चीन सरकारने काही दिवसांपूर्वी वुहान मधून कोविडचा प्रसार होण्यापूर्वीच इटली समवेत अन्य देशात तो पसरला होता असा दावा केला होता.

भारत चीन लडाख तणावाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांच्या या गटाने भारतात कोविड २०१९ च्या उन्हाळ्यात प्राण्यांमुळे दुषित झालेल्या पाण्यातून माणसात आणि मग वुहान मध्ये आल्याचे म्हटले आहे. या विषाणूला करोना अशी ओळख वुहान मध्ये दिली गेल्याचा त्यांचा दावा आहे. या टीमने या संदर्भातला एक संशोधन पेपर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार करोना विषाणू कसा बदलत गेला यावरून त्याची उत्पत्ती कुठे झाली असावी याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे म्हटले गेले आहे.

अन्य सर्व विषाणूंप्रमाणे करोना म्युटेट होतो व परत नव्याने तयार होतो असे या पेपर मध्ये नमूद केले गेले आहे. यामुळे त्याच्या डीएनए मध्ये किरकोळ बदल होतात. ज्या विषाणू मध्ये कमी बदल झाले ते शोधून त्याचा स्रोत शोधणे शक्य आहे असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. वुहान मधील करोना हा मुळचा विषाणू नाही तर तपासात तो भारत, इटली, चेक रिपब्लिक, अमेरिका, ग्रीस, बांग्ला, सर्बिया असा कुठेतरी निर्माण झाला असा दावा केला गेला असला तरी तो भारतातच निर्माण झाला असावा यावर जोर दिला गेला आहे. चीन भारताचा शेजारी देश असल्याने तो प्रथम चीनमध्ये आला असावा असेही या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.