२६/११च्या सूत्रधाराची माहिती देणाऱ्याला अमेरिका देणार ५० लाख डॉलर

वॉशिंग्टन: पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’चा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याचा ठावठिकाणा आणि त्याच्या या हल्ल्यातील सहभागाबद्दल ठोस माहिती देणाऱ्याला अमेरिकेने ५० लाख डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. हल्ल्याला १२ वर्ष झाल्यानंतरही पाकिस्तानने पाठीशी घातल्यामुळे तो अद्याप मोकाट आहे.

पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत केलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला तर ३०० जण जखमी झाले. दहशतवाद्यांपैकी ९ जणांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले तर अजमल कसाब याला पकडण्यात पोलिसांना यश आले. या अमानुष हल्ल्याचे नियोजन आणि संचालन साजिद मीर याने केले असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या असलेल्या एफबीआयच्या ‘मोस्ट वॉंटेड’ यादीत मीरचे नाव अग्रक्रमावर आहे.

विदेशात दहशतवादी हल्ले घडवून आणणे, दहशतवादी कृत्यांना सहकार्य करणे, साधनसामुग्री पुरविणे असे गुन्हे मीर याच्यावर अमेरिकेतील न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. २६/११ च्या हल्ल्यात ओलीस असलेल्यांना मारणे, गोळीबार, बॉम्बहल्ला याबाबत त्याने दहशतवाद्यांना सूचना केल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकन न्यायालयाने त्यांच्यावर २२ एप्रिल २०११ रोजी अटक वॊरंट बजावले आहे.