नागालँडमध्ये हिरे सापडल्याचे वृत्त व्हायरल: सरकारचे चौकशीचे आदेश

कोहिमा: मॉन जिल्ह्यात एका शेतकऱ्याला चमकता स्फटीक सापडल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन टेकडीचा परिसर खणण्यास सुरुवात केली. त्यानंतर टेकडी खणणारे नागरीक आणि हातात चमकणारे छोटे खडे घेतलेली माणसे, अशी छायाचित्र समाजमाध्यमांमधून व्हायरल होऊ लागली. या प्रकरणाची पाहणी आणि चौकशी करण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांचे पथक रावण करण्यात आले आहे.

वानचिंग या खेडेगावातील शेतकऱ्याला आपले शेत नांगरत असतानां एक चमकता स्फटीक सापडला. ही बातमी परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी शेतात गर्दी केली. या ठिकाणी आणखी ‘हिरे’ सापडू शकतील या आशेने त्यांनी परिसरातील टेकडीवर खोदायला सुरुवात केली. या प्रकारची छायाचित्र समाजमाध्यमातून व्हायरल झाली.

दरम्यान, या प्रकाराची दाखल राज्य सरकारने घेतली असून भूगर्भतज्ज्ञांचे पथक वानचिंगकडे रावण करण्यात आले आहे. या परिसरात हिरे सापडल्याची नोंद नसल्याने किंवा भूशास्त्रीयदृष्ट्या तशी शक्यता नसल्याने तज्ज्ञांनीही या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. घटनास्थळी खोदकामास मनाई करण्यात यावी. या प्रकाराबद्दल समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास मज्जाव करण्यात यावा. गावाबाहेरील लोकांना गावात येऊ देऊ नये असे आदेश स्थानिक ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.