आजपासून महाराष्ट्रात ‘या’ चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य


मुंबई – देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर त्याचबरोबर कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांमधून विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांची RT-PCR चाचणी (२५ नोव्हेंबर) आजपासून अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, दादर रेल्वे स्थानकावर या चाचणीसाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.

राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी यासंदर्भात यापूर्वीच विमान, रेल्वे आणि रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर केली आहे. त्याचबरोबर नवी प्रवास नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. त्यांना हा अहवाल विमानतळांवर तसेच रेल्वे स्थानकांवर दाखवावा लागणार आहे. विमान प्रवाशांना महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस आधी ही चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार नाही.

तसेच कोरोनाच्या निगेटिव्ह चाचणीसह जे प्रवाशी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांना विमानतळांवर RT-PCR चाचणी करुन घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवाशांना ही चाचणी झाल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे. तसेच कोरोना चाचणीचा रिपोर्ट ज्या रेल्वे प्रवाशांजवळ नसेल त्यांची रेल्वे स्थानकांवर अँन्टिजन चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव कुमार यांनी दिली.

त्याचबरोबर जे प्रवाशी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. महाराष्ट्राच्या सीमांवर त्यांची संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणत्याही प्रवाशात कोरोनाची लक्षणे आढळून आली, तर त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येईल. तसेच ज्यांची चाचणी निगेटिव्ह असेल त्यांना महाराष्ट्रात प्रवासाला परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर ज्या पॉझिटिव्ह केसेस आहेत, त्यांची थेट रवानगी कोविड केअर सेंटर्समध्ये करण्यात येणार आहे.