छटपूजेसंदर्भात राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना


मुंबई : यंदाच्या वर्षी देशभरातील सर्वधर्मियांचे सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. त्यात आता राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात असला तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नियमांचे पालन करत नागरिकांनी दिवाळी सण साजरा करावा अशा सूचना वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत. त्यातच आता उतर भारतीयांचा छटपूजा हा सणदेखील राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाचे सावट या सणावरही असल्यामुळे काही मार्गदर्शक सूचना सरकारने जारी केल्या आहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वर्षीचा उतर भारतीयाचा छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे. शासनाकडून त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याचे पालन करावे आणि आनंद साजरा करावा असे देशमुख यांनी म्हटले आहे.

छटपुजेसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

  • कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छटपूजा साजरी करावी.
  • कृत्रिम तलावांची निर्मिती महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
  • कोणत्याही स्वरूपाचे मंडप छटपूजा उत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतिषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.
  • छटपूजेदरम्यान उत्तर भारतीय नागरीकांनी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे तसेच जेष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.
  • निर्जंतुकीकरणाची व्यवस्था छटपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधील कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.