ममता दीदींसमोर युतीसाठी ओवेसी यांनी पुढे केला हात


कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून कालपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भिडण्याची भाषा करणाऱ्या एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांनी ममता दीदींसमोर युतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालची सर्व राजकीय समीकरणे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निर्णय बदलू शकतो.

बिहारमध्ये पाच जागा जिंकल्यानंतर आता पश्चिम बंगालकडे ओवेसींची नजर वळली आहे. ओवेसी प्रत्येक राज्यातील विधानसभेत आमदार पाठवून आपला पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. त्यातच, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी युती करण्याचा प्रस्ताव ओवेसींनी दिला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘नवभारत टाइम्स’ वृत्तपत्राने दिले आहे.

ओवेसी यांचा निवडणूकपूर्व युती करुन एकत्र ताकदीने रिंगणात उतरण्याचा मानस आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर यासारख्या अल्पसंख्याक मतदारसंघांवर ओवेसींची नजर असल्यामुळे सत्ताधारी तृणमूलचे बळ वापरुन मुस्लिमबहुल भागावर एमआयएम लक्ष केंद्रित करु शकते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ओवेसींना ‘उपरे’ म्हणत ममता बॅनर्जी यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अशात हातमिळवणी करायची झाल्यास त्यांना तात्विक तडजोड करावी लागेल. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात प. बंगालमध्ये मुख्य लढत मानली जाते. ममतांसमोर काँग्रेस आणि डाव्यांचे आव्हानही आहे. पण पूर्ण ताकदीनिशी ओवेसी मैदानात उतरले, तर त्याचा फटकाही ममता बॅनर्जींना बसू शकतो. भाजपने एमआयएमला तृणमूलची मते खाण्यासाठी बळ दिल्याचा आरोप तृणमूल खासदार सौगता रॉय यांनी केला होता. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एमआयएम भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप करत ओवेसींवर मतांचे ध्रुवीकरण केल्याचा घणाघात केला होता.