चीनमध्ये नव्हे तर या देशात मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाला होता कोरोनाचा जन्म


नवी दिल्ली – आता पर्यंत जगभरातील अनेक देशांनी कोरोनाची उत्पत्ती चीनमधील वुहानमध्ये झाल्याचा दावा केला होता. पण मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विषाणू इटलीमध्ये आढळून आल्याचा दावा आता मिलान शहरामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी केला असून मागील वर्षी नोव्हेंबरआधीपासूनच कोरोनाचा फैलाव सुरु झाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळेच जगभरात चीनमधील वुहानमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा चुकीचा आहे का यासंदर्भातील चर्चा आता सुरु झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या संशोधनाचा अभ्यास आता जागतिक आरोग्य संघटनाही करणार आहे.

कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार असून याची साथ येण्याआधी यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य चीनमधील वुहान प्रांतामध्ये या विषाणूची उत्पत्ती झाल्याचेही आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. पण त्याचवेळी आरोग्य संघटनेने या पूर्वीही इतर भागांमध्ये हा विषाणू पसरला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले होते. आरोग्य संघटनेकडून इटलीमधील संशोधकांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास केला जात असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे. हा अहवाल मागील आठवड्यामध्ये प्रसिद्ध झाला असून आम्ही यासंदर्भातील माहिती मागवल्याचे आरोग्य संघटनेने सोमवारी स्पष्ट केल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण इटलीमध्ये २१ फेब्रुवारी रोजी लोम्बार्डी प्रांतामधील मिलानजवळच्या छोट्या शहरामध्ये आढळला होता. इटालियन संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा अहवाल तुमोरी जर्नलमध्ये छापून आला आहे. ९५९ स्वयंसेवक या अभ्यासामध्ये सहभागी झाले होते. या तरुणांच्या फुफुसांचे स्कॅनिंग करुन त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे की नाही हे तपासण्यात आले. सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान या चाचण्या पार पडल्या. यापैकी ११.६ टक्के तरुणांच्या शरीरामध्ये इटलीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याआधीच म्हणजेच फेब्रुवारीआधीच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आले.

यानंतर सिएना विद्यापीठामध्ये सार्स कोव्ही-टू या विषाणूसाठीच्या अ‍ॅण्टीबॉडीजची चाचणी करण्यात आली. हा अहवाल इटलीमध्ये साथपूर्वी कालावधीमध्ये अनपेक्षितपणे सार्स कोव्ही-टू अ‍ॅण्टीबॉडीज सापडण्यासंदर्भात, अशा मथळ्याखाली तयार करण्यात आला आहे. काही स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये मागील वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या. म्हणजेच या चार जणांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या अहवालाचे लेखक असणाऱ्या जिओव्हानी ओप्लोवन यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटले आहे. या संशोधनाचा अर्थ असा होतो की कोरोनाचा मोठ्याप्रमाणात फैलाव होण्याआधी हा विषाणू अस्तित्वात होता. त्यावेळी तो कमी घातक असल्याचे जिओव्हानी म्हणाले.

या अभ्यासासंदर्भातील सर्व माहिती हा अहवाल सादर करणारे लेख, संशोधक यांच्याशी संपर्क करुन घेतली जाणार असून संशोधनाची पद्धत, नमुने या सर्वांचाही पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लोम्बार्डी प्रांतामध्ये अचानक मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा विषाणू त्याचवेळी यापूर्वीपासून अस्तित्वात असू शकतो, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला होता.