माऊथ वॉशमधील ‘हा’ घटक नष्ट करतो करोनाचा विषाणू


लंडन: रोजच्या वापरातील साधा माऊथ वॉश बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक रसायन केवळ ३० सेकंदात करोनाच्या विषाणूला नष्ट करू शकत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. मात्र, हे संशोधन सध्या तरी केवळ प्रयोगशाळेच्या स्तरावरच असून त्यामुळे माऊथ वंशाच्या वापराने करोनावर उपचार करता येत असल्याचे सिद्ध झालेले नाही. तरीही त्या दृष्ठीने प्रयत्न करण्यास वाव असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

कार्डीफ विद्यापीठाच्या संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात माऊथ वॉशमधील सेंटिपायरिडीनियम क्लोराईड (सीपीसी) या रसायनाच्या संसर्गात करोनाचा विषाणू आल्यास तो केवळ ३० सेकंदात नष्ट होतो असे या संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. या संशोधनाचा निबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यापूर्वी झालेल्या एका संशोधनाशी हे निष्कर्ष मिळते जुळते आहेत. अर्थात मानवी शरीरातील विष्णुपर्यंत जाऊन त्याला नष्ट करण्यासाठी हे विशिष्ट रसायन मानवी फुप्फुसांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि माऊथ वॉशद्वारे ते शक्य नाही. त्यामुळे कोविड १९ वरील उपचार म्हणून त्याचा वापर करायचा झाल्यास अधिक संशोधन करावे लागणार आहे.

अर्थात करोनाला नष्ट करणारे रसायन सापडणे हा देखील त्यावरील संशोधनाचा मैलाचा दगड आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. माऊथ वॉशच्या वापराने थुंकी आणि घशातील द्रवामध्ये असणारे करोनाचे विषाणू नियंत्रणात अनंत येईल का, या दृष्टीने आता रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचा निष्कर्ष येण्यास पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.