एनडीएच्या नेतेपदी नितीश कुमारांची निवड; सोमवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी


पाटणा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा शपथविधी सोमवारी सकाळी ११.३० वाजता पार पडणार असून नितीश कुमार यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. आज एनडीएची बैठक पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केलेले असताना यावर नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगले होते. यासोबतच मुख्यमंत्रीपदावा दावा आपण केला नसल्याचेही म्हटले होते. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

भाजप, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासंबंधी नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवले आहे. भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या, तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला.