ओबामांचे आता काही खरे नाही, ओबामांवरील टीकेवरुन राऊतांना निलेश राणेंचा टोला


मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. भारतातील राजकीय नेत्यांबाबात परदेशातील राजकीय नेते अशा पद्धतीचे मत जाहीर करु शकत नसल्याचे संजय राऊत यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. भारताबद्दल बराक ओबामा यांना किती माहिती असल्याची विचारणाही संजय राऊत यांनी केली होती. भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन टोला लगावला आहे.


निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांना झोप लागत नसेल असा टोला लगावला आहे. शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल. आता ओबामांचे कसे होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचे आता काही खरे नाही, असे निलेश राणे यांनी उपहासात्मक ट्विट केले आहे.

आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ओबामा यांनी पुस्तकात राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचे म्हटले आहे. भारतातील राजकीय नेत्यांबद्दल परदेशातील राजकारणी अशी मते व्यक्त करु शकत नाहीत. ट्रम्प वेडे आहेत, असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला.