खुशखबर! रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला


रायगड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश काढले असून त्यानुसार आता रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत. दरम्यान, येथील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.

रायगडमधील सर्व पर्यटन स्थळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या काळात रायगड पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे. रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्‍हयातील सर्व गडकिल्‍ले आणि पर्यटन स्‍थळे तसेच स्‍मारके खुली करण्‍यात आदेश काढले आहेत. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्‍यांपासून या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्‍हता. ही ठिकाणे खुली करावीत, अशी मागणी विविध संस्‍था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती.

त्याचबरोबर महाड येथील मनोज खांबे यांनी यासाठी आमरण उपोषणाचा इशाराही दिल्यानंतर ही स्थळे खुली करण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिले होते. पण त्याची पूर्तता होत नव्हती, म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. आता रायगड किल्‍ल्‍याबरोबरच चवदार तळे व इतर गडकिल्‍ले या ठिकाणी जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशामुळे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच त्‍यावर आधारीत रोजगार पुन्‍हा सुरू होणार आहेत. पण हे करताना सोशल डिस्‍टन्‍सिंग, मास्‍क वापरणे यासारख्‍या आरोग्‍य विभागाने ठरवून दिलेल्‍या नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.