अर्णब गोस्वामींना मोबाईल देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची जामिनावर मुक्तता केली आहे. न्यायालयीन कोठडी दरम्यान अर्णब गोस्वामी यांना मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कैद्यांना तुरुंगात स्वत:चा मोबाईल वापरण्यास दिल्याप्रकरणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

अलिबाग येथील न्यायालयासमोर अर्णब गोस्वामी यांना अटक करून हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी गोस्वामी यांना सुनावण्यात आली होती. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांची न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी अलिबाग येथील शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. पण अर्णब गोस्वामी हे तिथे असताना मोबाईल वापरत असल्याचे तसेच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले होते.

त्यानंतर कारागृह प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. तसेच याबाबत तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांकडेही चौकशी करण्यात आली होती. त्यामधून पैसे घेऊन दोन पोलीस कर्मचारी हे कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास देतात, अशी माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.