आता देवानेच माझ्या कोकणाला अशा मूर्खांपासून वाचवावे – नितेश राणेंची राऊतांवर टीका


सिंधुदुर्ग : सध्या सोशल मीडियावर रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊत ट्रोल झाले आहेत. दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे होते. त्यांनी यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. या दोन्ही नेत्यांनी यावेळी मास्क परिधान केला होता. पण खासदार राऊत यांना अचानक शिंका आली आणि त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून नाकावर हात धरून शिंकले. त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे.


तोंडावर मास्क कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून घालतात. पण खासदार राऊत शिंकताना नेमके हेच विसरले. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. हा व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनीदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार. त्यांनी मास्क का घातला आहे, असे त्यांना एकदा विचारा?, अशा आता देवानेच माझ्या कोकणाला अशा मूर्खांपासून वाचवावे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांचा आमदार नितेश राणेंनी समाचार घेतला आहे.