आपला पक्षच विसरले ज्योतिरादित्य शिंदे; केले काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन


भोपाळ : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची लगबग सुरू असून आपल्याच पक्षाला समर्थन देण्यासाठी नेते भरगच्च जाहीर सभांमध्ये मतदारांना आवाहन करताना दिसत आहेत. या पोटनिवडणुकीत सर्व पक्षीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

दरम्यान काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. पण ज्योतिरादित्य शिंदे एका जनसभेत आपला पक्षच विसरले आणि त्यांनी चक्क काँग्रेसलाच मत देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. यादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भाजप नेते ज्योतिरादित्य यांच्याकडे केवळ पाहातच राहिले.

भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या समर्थनासाठी शनिवारी डबरामध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान या सभेला ज्योतिरादित्य शिंदे यांनीही हजेरी लावली. याच दरम्यान हा प्रसंग घडला. ३ तारखेला पंजेवाला बटण दाबले जाईल, असे म्हणताना ज्योतिरादित्य शिंदे या व्हिडिओत दिसत आहेत.

शिवराज सिंह आणि आम्हाला हात उंचावून हा विश्वास द्या, माझी डबराची जनता, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ तारखेला हाताचा पंजा असलेले बटण दाबेल, असे म्हणत असतानाच ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या मोठ्या चुकीची जाणीव झाली. मग लगेचच आपली झालेली चुक सुधारत कमळाचे फूल असलेले बटण दाबणार आणि हाताचा पंजाच्या बटणाला बोझाबिस्तरा बांधून आम्ही येथून रवाना करणार, असे म्हणत वेळ मारुन नेली.


सोशल मीडियावर ज्योतिरादित्य शिंदे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांचा हा व्हिडिओ चक्क काँग्रेसनंही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत नक्की कोणत्या पक्षात आपण आहोत, याबद्दल आपले छोटे महाराज थोडेसे गोंधळलेले असल्याचे म्हणत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनीही ज्योतिरादित्य शिंदे यांना चिमटा काढला आहे.