आता एचडीएफसी बँकेत जमा होणार मुंबई पोलिसांचे पगार


मुंबई : आता एचडीएफसी बँकेत मुंबई पोलिसांचे पगार जमा होणार आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेकडून पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार जमा करण्याबाबतचा करार करण्यात आला होता. ३१ जुलै २०२० रोजी या कराराची मुदत संपली आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेत पगार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

अ‍ॅक्सिस बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे सरकारने २०१५ साली पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलीसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँक पोलिसांनी द१० लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे.

मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत अशा सुविधा देणार आहे.