यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती


नागपूर – राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात यशोमती ठाकूर यांनी धाव घेतली होती. शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून पोलिसांना नोटीस बजावली आहे.

यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावती न्यायालयाने एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मारहाणीची ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती.

शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह घटनेच्या दिवशी चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यावेळी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास मनाई केली.

त्यावर उल्हास रौराळे यांच्यासोबत यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून वाद घातला आणि मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणात ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील १ साक्षीदार फितूर झाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.