Viral : मदतीसाठी फोन करणाऱ्या मतदाराला खासदार वरुण गांधी म्हणाले… मी तुमच्या बापाचा नोकर नाही


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील पीलीभीत मतदारसंघाचे भाजप खासदार वरुण गांधी हे सध्या टीकेचे धनी होत आहेत. त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये खासदार वरुण गांधी यांना एका स्थानिकाने मदत मागण्यासाठी फोन केला असता, त्यांच्यात झालेला संवाद ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.

पण वरुण गांधी यांनी रात्री अपरात्री मदतीसाठी फोन केल्याने मदत करण्याऐवजी नको त्यावेळी फोन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच मी तुमच्या बापाचा नोकर नाही, असे उत्तरही वरुण गांधी यांनी दिल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवत केला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार वरुण गांधींचा या ऑडिओ क्लिपमधील आवाज असल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वरुण गांधींना पीडित व्यक्तीने मदतीसाठी फोन केला होता. या मुलाला वरुण यांनी त्याचे नाव वगैरे विचारले. आपण पीलीभीतचे असल्याचे सांगत तरुणाने तक्रार सांगण्यास सुरुवात केली, पण त्यानंतर ऑडिओत ऐकू येत आहे त्या प्रमाणे वरुण गांधी यांनीच त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. रात्री हा वेळ फोन करण्याचा नसतो. जर माझ्याशी तुला बोलायचे असेल तर सकाळी फोन कर, असे ऑडिओमधील नेत्याने तक्रारदाराला सांगितले.


या त्यावर युवकाने, भैया, आता काम होते म्हणून आता फोन केला, असे उत्तर दिले. त्यानंतर या ऑडिओमध्ये ऐकू येत आहे त्याप्रमाणे वरुण गांधी यांनी नाराजी व्यक्त करताना, मी तुमच्या बापाचा नोकर नाही, जे रात्री १० वाजता मी तुमच्याशी बोलू. जर तुम्हाला रात्री १२ वाजता काम असेल तर मी रात्री १० किंवा १२ वाजता तुमच्याशी बोलू शकत नाही. मला माफ करा. तुम्ही सभ्य गृहस्थाप्रमाणे मला सकाळी फोन करा, असे सांगितल्याचा दावा केला जात आहे. तरुणाने यावर, मी तुमच्या मतदारांपैकी एक आहे. तुम्ही नाही ऐकणार तर कोण ऐकणार आमच्या तक्रारी? असा प्रश्न विचारला. यावर समोरुन, सकाळी ऐकतो. मी तुमचा नोकर नसल्याचे उत्तर देण्यात आले.

काँग्रेसचे नेते राकेश सचान यांनी वृत्तवाहिन्यांनी चालवलेला हाच ऑडिओ पोस्ट करत वरुण गांधींवर निशाणा साधाला आहे. पाहा पीलीभीतचे खासदार वरुण गांधीचा खरा चेहरा. जनतेचे ऐकून घेणे तर लांबच राहिले त्यांना हे धमकी देत आहेत. मी तुमच्या बापाचा नोकर नाही जे तुमची गाऱ्हाणी रात्री १० किंवा १२ वाजता ऐकून घेऊ अशी धमकी देत आहेत. तुमच्याबरोबर जे लोक कायम उभी राहतील अशांना प्रतिनिधी म्हणून निवडा. त्यामुळे यापुढे असे प्रतिनिधी निवडा जे तुम्हाला मदत करायला कधीही तयार असतील, असे सचान यांनी म्हटले आहे.