Viral Video: नितीश कुमारांच्या जाहिर सभेत धक्कादायक घोषणाबाजी


पाटना – अवघ्या काही दिवसांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी होणाऱ्या प्रचारसभांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रचारामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकजण उतरल्याचे चित्र दिसत आहे. नितीश कुमार यांच्या अशाच एका प्रचारसभेमध्ये सोमवारी एक विचित्र प्रकार घडला.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज येथे प्रचारसभा सुरु होती. मतदारांना मुख्यमंत्री संबोधित करत असतानाच अचानक समोरच्या गर्दीमधून एकजण, नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है। अशा घोषणा देऊ लागला. पोलिसांनी आणि जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे सभेमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर या व्यक्तीला पोलिसांनी सभेच्या ठिकाणाहून बाहेर नेले आणि सभा पुन्हा सुरु झाली. या व्यक्तीची महारेगासंदर्भातील (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांबद्दल नाराजी असल्याचे समजते.


मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला काही कागदपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवायची होती. पण त्याला जदयुच्या कार्यकर्त्यांनी पुढे काही बोलू न दिल्यामुळेच या व्यक्तीने मोठ्याने आरडाओरड करुन घोषणा देण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री नितीश कुमार मंचावरुन पाहत होते. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला जो कागद माझ्यापर्यंत पोहचवायचा आहे, तो त्याच्याकडून घ्या आणि त्याच्याशी शांतपणे चर्चा करा, असे पोलिसांना सांगितले.