पूरग्रस्तांचे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही : शरद पवार


मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर असून यादरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, कर्ज काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून आग्रह करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ओल्या दुष्काळाच्या झळा मराठवाड्यातील शेतकरी सोसतो आहे. महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटाला तोंड देत आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहे. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असून हा प्रश्न खूप मोठा आहे. यावर सगळ्यांनी एकत्र येऊन मात करायला हवी. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन मार्ग काढायला हवा, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, पीक पाहणी पंचनामे पुर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येत नाहीत. ती प्रकिया पार पडल्या शिवाय मदत करता येणार नाही. पाण्यात वाहून गेलेल्या सोयाबीनला नियमात तरतूद नाही, ती करण्याची मागणी आम्हाला करावी लागणार आहे. जनावर वाहून गेली, गाव पातळीवर रस्ते खराब झाले यात मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. सध्या महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट असतानाच अतिवृष्टीचा मोठा फटका ऊसाला बसला आहे. मोठया प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. कारखाने लवकर सुरू झाले तर त्याचा गाळप होईल, त्यामुळे उसाचे कारखाने लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करू, असे शरद पवार यांनी सांगितले.