महिलांचा लोकल प्रवास सध्यातरी लांबणीवर पडण्याची शक्यता


मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनने सर्वच महिलांचा प्रवास करणे सध्यातरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महिलांना लोकलने प्रवासाची मुभा देण्याची तयारी दाखवत राज्य सरकारने रेल्वेला विनंती केली होती. पण सरकारसमोर रेल्वे विभागाने अडचणींचा पाढा वाचला असून अनेक प्रश्नांची उत्तरे मागितल्यामुळे तुर्तास तरी महिलांचा लोकल प्रवास हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिलांना सध्या नोकरीसाठी ऑफिस आणि कामावर पोहोचण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणीही होत होती. त्यामुळे राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवून लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. पण रेल्वेने सरकारला अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तर मागितली आहे.

सरकारकडून किती प्रमाणात महिला प्रवासी वाढू शकतील ही आकडेवारी रेल्वेने मागितली आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने महिलांसाठी लोकल चालवण्याची कार्यपध्दती ही सरकारकडून अपेक्षित असल्याचे कळवले आहे. त्यामुळे रेल्वे सरसकट महिलांना प्रवाशांना लोकल प्रवास करू देण्यासाठी तयार नाही का? असा प्रश्न आता महिला प्रवासी विचारू लागल्या आहेत.

रेल्वेने किती महिला प्रवासी प्रवास करू शकतील असा प्रश्न विचारला याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सगळा डेटा रेल्वेकडेच असताना त्यांनी माहिती का विचारली याबाबतही नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 700 तर मध्य रेल्वे वर 706 ट्रेन सुरू आहेत. सध्या उत्सवांचे दिवस असल्याने महिलांना प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत आहे.