उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; अर्णबच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घ्या


मुंबई : आज (19 ऑक्टोबर) ‘टीआरपी घोटाळा’ प्रकरणी रिपब्लिक चॅनेलच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. चॅनेलच्या टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रिपब्लिक चॅनेलने सीबीआयकडे हे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पण रिपब्लिक चॅनेलची ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तर, अर्णब गोस्वामीला थेट अटक न करता, त्याला आधी समन्स द्या, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर त्याच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घेण्यात यावा, असे देखील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आज या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ज्येष्ठ वकील हरीश साळवे रिपब्लिक चॅनेलतर्फे, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने न्यायालयापुढे बाजू मांडली. मुंबई पोलिसांकडून टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ या वाहिन्यांना या प्रकरणात अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती.