अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द


पुणे – बुधवारी दुपारपासून पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढले आहे. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून नंतर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

अनेक सोसायट्यांमध्ये जोरदार पावसामुळे तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरले होते. असाच मुसळधार पाऊस आणखी दोन दिवस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पण पावसाचा जोर बुधवारी दुपारपासून वाढल्याने शहराच्या मध्यभागी म्हणजेच पेठांचा सर्व भाग पाण्याने व्यापला होता. ५० हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. मदतीसाठी अग्निशामक विभागाच्या कार्यालयमध्ये सतत फोन सुरु होते.

पावसात अनेक नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडल्यामुळे पोलिसांना टेबलवर बसून काम करावे लागले. दुसरीकडे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून नदी पात्रात धरण क्षेत्रातून ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.