आता ऑनलाइन मिळणार जन्म-मृत्यूचे जुने दाखले


मुंबई – आता सर्वसामान्य जनतेला जन्म-मृत्यूचे जुने दाखले मिळण्यासाठी आता महानगरपालिकेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाही. कारण आता यापुढे असे जुने दाखले ऑनलाईन मिळवता येणार आहेत. याबाबतचा निर्णय येत्या 14 दिवसांत घेण्यात येणार आहे.

महानगरपालिकेकडे जन्म आणि मृत्यूची नोंद करणे अनिवार्य असते. पण, 45 ते 50 वर्षांपूर्वी काही जणांचा जन्म हा झाला आहे. पण, अजूनही त्यांनी हे जन्माचे दाखले घेतले नाहीत किंवा मृत्यूची नोंद केली नाही, ज्यांनी असे दाखले घेतले पण त्यांच्याकडून ते हरवले आहेत, अशा व्यक्तींसाठी पालिका आता लवकर हे दाखले ऑनलाईन मिळवून देणार आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली यात. जुने जन्म-मृत्यूचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

2007 पर्यंत जन्म आणि मृत्यूचे दाखले पालिका कार्यालयात लिखित स्वरूपात मिळत होते. त्यानंतर संगणकीकरण झाले आणि नागरिकांना संगणकीय दाखले मिळू लागले. पण, 45 ते 50 वर्षांपूर्वीचे जन्म आणि मृत्यूचे दाखले ज्या व्यक्तींना हवे असतील तर अशा व्यक्तींना पालिका कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी वेळ वाया जात असल्यामुळे पालिका वॉर्ड कार्यालयातील जुन्या नोंदवह्या स्कॅन करून असे दाखले डिजिटलाईजेशनमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याची नोंद कॉम्प्युटरमध्ये करण्यात येणार आहे.

ज्या व्यक्तींना जन्म-मृत्यूच्या जुन्या नोंदी हव्या असतील त्यांना त्या त्वरित उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.