नवरात्रोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेची नियमावली


मुंबई – कोरोनाचा प्रसार गणेशोत्सव काळात नागरिकांच्या भेटीगाठी वाढल्याने पुन्हा सुरू झाल्यामुळे नवरात्रोत्सवात विशेष खबरदारी घेतली जाणार असल्यामुळे याआधीच यंदा दांडिया रंगणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार देवीच्या दर्शनाची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच महापालिकेकडून सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर आणि नियमित निर्जंतुकीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा वाढत गेली. मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यातच नवरात्रोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. महापालिकेने हा धोका टाळण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीनुसार देवीची घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूटच ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

३० सप्टेंबरपासून सार्वजनिक मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये यंदा स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी गतवर्षी परवानगी घेतलेल्या मूर्तीकारांना घ्यावी लागणार नाही. पण या परवानग्या नवीन मूर्तीकारांना घेणे बंधनकारक असेल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. पारंपरिक मूर्तिकारांना परवानगी देण्यात येत असून अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

तसेच यावर्षी गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. तसेच देवीच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था सार्वजनिक मंडळांना करावी लागणार आहे. त्याचबरोबर देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वच मंडळांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे. मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरणची व्यवस्था असावी. तसेच मंडपात एकावेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.