केंद्राच्या पथकाने व्यक्त केली पुण्यात डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता


पुणे : केंद्र सरकारच्यावतीने पुण्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली असून पुणे महानगरपालिकेने त्यादृष्टीने तयारी करावी. त्याचबरोबर या शिष्टमंडळाने पुणे पालिका प्रशासनाला खाटांच्या उपलब्धतेविषयी सतर्क राहावे अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. तसेच या शिष्टमंडळाने पालिकेने उभे केलेले ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, रुग्णालयातील सुधारणा, खाटांचे नियोजन आणि कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होण्यासंदर्भात राबविलेल्या उपाययोजनांविषयी समाधान व्यक्त केले.

ज्या अपेक्षा केंद्र सरकारच्या आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका सक्षमपणे काम करीत असल्याचे निरीक्षण या शिष्टमंडळाने नोंदवले. यासंदर्भात शिष्टमंडळातील एका सदस्याने पुण्यामध्ये समाधानकारक काम झाल्याचे सांगितले. मागील चार दिवसात पुण्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी पुण्यातील विविध कोविड सेंटरमध्ये भेट दिली.

त्यानंतर त्यांनी शहरातील उपाययोजनांची माहिती घेऊन महापालिकेत बैठका घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांचा ६ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला दौरा शुक्रवारी संपला. या पथकाने तपासण्या वाढविण्यापेक्षा आवश्यकतेनुसारच तपासण्या करण्याचे निर्देश दिले. आयसीएमआरच्या तपासणी बाबतच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या ही सूचना देण्यात आल्या. कोरोना व्यतिरिक्त अन्य व्याधी असलेल्या रुग्णांचे अधिकाधिक सर्वेक्षण करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध होतील आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका टळेल, याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.

पुण्यात तपासण्यांची संख्या कमी करण्यात आली असून रुग्ण संख्येची टक्केवारी पाहता रुग्ण संख्या घटल्याचे दिसत आहे. दोन हजार रुग्ण पुण्यामध्ये दिवसाला आढळून येत होते. पण हे प्रमाण मागील काही दिवसांपासून दिवसाला सातशेच्या आसपास येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. पुण्यातील रुग्ण वाढीचा दर आणखी कमी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर या पथकाने पुण्यातील जम्बो रुग्णालय आणि अन्य कोविड सेंटरमध्ये तसेच खाजगी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. रुग्णांना खाटा उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांसोबत तसेच रूग्णांसोबत संवाद साधल्यावर त्यांनी आरोग्य व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. नागरिकांनीही सर्व प्रकारची काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.