कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश


बंगळुरु – बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतविरोधात कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्विटसाठी प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी पोलिसांना हे आदेश कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयाने दिले. कंगना विरोधात वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधा एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

वकील रमेश नाईक यांनी आपण दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने एफआयआर दाखल करण्यासोबतच याप्रकरणी तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे सांगितले. कायद्यात विधेयकांचे रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषी विषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. सरकारला काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रचंड विरोध केला. तर, दिल्ली, हरयाणा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंजुरीनंतर ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही देखील दिली. यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने मोदींच्या ट्विटला रिट्विट करत त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आणि या विधेयकांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली होती.