येत्या सोमवारपासून धावणार पुणे-लोणावळा लोकल


पुणे : कोरोना संकटामुळे मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून पुण्यातील लोकल ट्रेन बंद आहेत. पण सोमवारपासून (12 ऑक्टोबर) लोणावळा लोकल धावणार आहे. सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून पहिली लोकल सुटणार आहे. लोकल सुरु झाल्याने पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पुणे रेल्वे स्थानकातून सायंकाळीही दुसरी लोकल ट्रेन धावणार आहे. संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दुसरी लोकल ट्रेन पुण्याहून सुटणार आहे. लोणावळा येथून सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एकच लोकल सोडण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच लोकल ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाही.

दरम्यान जून-जुलैच्या दरम्यान मुंबई लोकलही अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. पण तरीही ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारचा 15 ऑक्टोबरपर्यंत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतची शक्यता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्तवली होती. आम्हा सर्वांचाच असा विचार आहे की, लोकल ट्रेन आता सुरु कराव्यात, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.