कोकणातील प्रकल्प लातूरला हलवा, अमित देशमुखांची मागणी; शिवसेना खासदाराची सडकून टीका


मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि काँग्रेसच्या राज्यातील मंत्र्यामध्ये कोकणातील प्रकल्प थेट मराठवाड्यातील लातूरला नेण्याची मागणी केल्याने वाद पेटला असून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर महाविकास आघाडीत प्रकल्प पळवापळवी होऊ नये, असे म्हणत टीका केली आहे.

कोकणातील दोडा मार्गमधील आढाळी भागात केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. परंतु, ठाकरे सरकारमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांटवरून असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकल्पाबद्दल काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मागणी केली आहे. कोकणाला यासाठी आयुष मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी केली. अमित देशमुख यांच्या या मागणीमुळे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे चांगलेच संतापले आहे.

कोकणाच्या वाट्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा एक महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरीही दिली आहे. तसेच आढाळी एमआयडीसीतील 60 एकर जागा सुद्धा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे. पण, अचानक अमित देशमुख यांनी हा प्रकल्प लातूरला हलवण्याची मागणी करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे, हे पूर्वनियोजित असून अत्यंत निंदनिय असल्याचे म्हणत विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प मिळवला होता. पण सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातील असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले असल्याचे म्हणत विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. अमित देशमुख यांनी केली मागणी ही योग्य नाही. त्यामुळे ही बाब आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांनी यात लक्ष घातले असल्यामुळे पुन्हा एकदा आयुष मंत्रालयाकडून याबद्दल विचारणा झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प सिंधुदुर्गातच व्हावा अशी आम्ही मागणी केली असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.