सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्


मुंबई – साडेतीन महिन्यांपेक्षा अधिकच काळ अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला लोटून गेला असला तरी त्याच्या मृत्यूवरून सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नाही. सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पण मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यामाध्यमातून बदनामी केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील हिंदुस्थान टाइम्सने वृत्त दिले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. या एक विशेष म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नसून इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत. परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचे काम आम्ही करत असल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.