ऑस्ट्रेलियातील इमामाचा दावा; इस्लाममध्ये हराम आहे कोरोनाची लस घेणे


पर्थ – मुस्लिमांनी कोरोनाची लस न घेण्याचे आवाहन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील एका इमामाने केले आहे. इस्लामच्या दृष्टीने कोरोना लस घेणे हराम असल्याचा दावाही या इमामाने केला आहे. मुस्लिमांनी ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेका तयार करत असलेली कोरोना लस घेऊ नये, असे पोस्ट केलेल्या व्हिडिओत या इमामाने म्हटले आहे. अशाप्रकारे लस घेणे इस्लाममध्ये निषिद्ध मानले जाते, असा दावा या इमामने केला आहे.

युट्यूबवर मुस्लिमांना आवाहन करणारा एक व्हिडिओ पर्थ येथील मशीदीमधील इमाम सुफियान खलीफा यांनी पोस्ट केला आहे. या इमामाने ऑस्ट्रेलियन मुस्लिमांना एकत्र येण्यासाठी संदेश : प्रेषितांचा मार्ग निवडा, अशा मथळ्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कोरोनाचा लस बनवण्यासाठी कंपनीने कोणत्या पद्धतीचा वापर केला आहे याबद्दलची माहिती आपण देत असल्याचे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

लस वापरण्याचे समर्थन करणाऱ्या काही मुस्लिम संस्थांची लाज वाटते. यासंदर्भात फतवा जारी करणाऱ्या कोणत्याही इमामाचा निषेध असल्याचे म्हणतच खलीफाने या व्हिडिओमध्ये लसीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ही लस म्हणजे हराम असल्याचे ठाऊक असल्यानेच याविरोधात कॅथलिक उभे राहिल्याचे दिसत आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे. पण तुम्ही याबाबतील सरकारबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेत असला तर विचार करा, असे व्हिडिओत हा इमाम बोलताना दिसतो.

खलीफा हा अशाप्रकारे कोरोना लसीला हराम असल्याचे सांगणारा एकमेव इमाम नाही. ऑस्ट्रेलियामध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या अस्त्राझेनेकाच्या कोरोना लसीला विरोध करणाऱ्या धार्मिक व्यक्तींची संख्या वाढताना दिसत आहे. यासंदर्भात मेल ऑनलाइनमध्ये आलेल्या वृत्तानुसार कोरोना लसीसंदर्भात सिडनीमधील कॅथलिक मुख्य बिशप, अँगलिकॅन मुख्य बिशप आणि ग्रीक ऑर्थडॉक्सचे मुख्य बिशपने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यांनी यामध्ये कोरोना लसीचे २५ मिलियन डोस तयार करण्यासंदर्भातील सरकारच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा असे म्हटले आहे.

सरकारने कोरोना लसीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे आपण चिंतेत असल्याचे एका वरिष्ठ बिशपने सांगितले आहे. गर्भाशयाशी संबंधित पेशींचा वापर कोरोनाच्या लसीमध्ये केला जात असल्यामुळे ख्रिश्चनांसमोर नैतिक पेच निर्माण होऊन वंशाला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी वाढता विरोध लक्षात घेऊन यासंदर्भात आपण तपास करत असून कोरोना लसीचा जास्तीत जास्त ऑस्ट्रेलियन व्यक्तींना लाभ घेता येईल अशी लस निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची लस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत ही अयोग्य असून दुसऱ्या पद्धतीने लस निर्माण करण्यासंदर्भात विचार करण्याची मागणी वेगवेगळ्या चर्चमधील बिशपने केली आहे.