वॉशिग्टन – आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्यासाठी संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनाची लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नाही अशी भूमिका आहे. जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्थांमुळे अशा प्रकल्पात काम करताना काही गोष्टी कराव्याच लागतील. अमेरिकेने इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करणे मान्य नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास नकार दिला आहे.
ट्रम्प प्रशासन करणार नाही आंतरराष्ट्रीय समुदायासोबत लस विकसित करणे आणि वितरणासाठी काम
स्वबळावर लस विकसित करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टने दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार, चीनच्या प्रभावाखाली जागतिक आरोग्य संघटना असून मोठया प्रमाणावर जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे. १५० पेक्षा जास्त देश कोरोनावरील लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असून जागतिक आरोग्य संघटनेशी हा गट जोडलेला असल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, लस उत्पादक कंपन्यांसोबत विविध देशांची सरकारे व्यक्तीगत पातळीवर करार करत आहेत. ‘कोव्हॅक्स’मध्ये सहभागी होण्याचा त्यांना सुद्धा फायदा होईल. एखाद्या देशाचा लस उत्पादक कंपनीसोबत करार यशस्वी होऊ शकला नाही, तरी ‘कोव्हॅक्स’च्या माध्यमातून ती लस त्या देशाला मिळू शकते.
कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाचे लस कधी उपलब्ध होईल याकडे लागले आहे. यादरम्यान AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. कोरोनाविरोधात AstraZeneca ची लस वापरण्यासाठी परवानगी मिळेल, असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
तुम्हा सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे की, तिसऱ्या वैद्यकीय चाचणीत AstraZeneca ची लस पोहोचल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितले. AstraZeneca कोरोना लस तयार करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर Moderna आणि Pfizer यांची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे.