रोहित पवारांच्या नावाने नवी अराजकीय संघटना, पण रोहित पवारांचा विरोध


मुंबई : सध्याच्या तरुणाईमध्ये राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांची चांगलीच क्रेझ आहे. पण आता एक अराजकीय संघटना त्यांच्या नावाने स्थापन करण्यात आली आहे. पण रोहित पवार यांनी या संघटनेला विरोध केला असून त्याचबरोबर त्यांनी हे योग्य नसल्याचे म्हणत राष्ट्रवादीसोबत काम करण्याचे आवाहन केले आहे.

‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ अशा नावाने बिगर राजकीय संघटना काही तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. पण रोहित पवार यांना हा निर्णय पटलेला नाही. त्यांनी तात्काळ ट्विट करून त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की, मी #NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणे योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील.

‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ नावाची अराजकीय संघटना काही तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केली. दरम्यान सोशल मीडियावर या संघटनेची पदे आणि जबाबदाऱ्या वाटपाची काही पत्रे व्हायरल झाली आहेत. औरंगाबादमध्ये संघटनेचे कार्यालय असल्याचे पत्रकावरुन लक्षात येते. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ देवकते हे असल्याचे देखील यावरुन समोर आले आहे. लातूर, नाशिक, परभणी, औरंगाबादपर्यंत या संघटनेचा विस्तार करण्यात आल्याचे पत्रकांवरुन दिसत आहे. याबाबत माहिती मिळताच रोहित पवार यांनी गंभीर दखल घेऊन या कार्यकर्त्यांना ही संघटना स्थापन न करण्याची विनंती केली आहे.