रशियाने 6 दशके दाबून ठेवलेले रहस्य उलगडले; जगासमोर आणला सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब


चीनकडून जगातील सर्वच देशांना कोरोनाची देण मिळाल्यामुळे संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतानाच सोव्हिएत संघ म्हणजेच रशियाने जगाला हादरा दिला आहे. आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब चाचणीचा व्हिडीओ रशियाने जारी केल्यामुळे रशियाचे टॉप सिक्रेट जगासमोर आले आहे. रशियाने केवळ 7 वर्षांत हा अणुबॉम्ब अमेरिकेला टक्कर देण्यासाठी शीतयुद्धावेळी बनविला होता. 30 ऑक्टोबर 1961 मध्ये बॅरंट सागरात Tsar Bomba डिव्हाईसचे परीक्षण करण्यात आले.

या अणुबॉम्बचे नाव ईवान असे असून हा अणुबॉम्ब एवढा विनाशकारी आहे की, अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेला अणुबॉम्ब याच्यापुढे काही काहीच नसून हा अणुबॉम्ब हिरोशिमापेक्षा 3333 पट अधिक घातक आहे. विशेष म्हणजे ही चाचणी आताची नव्हे तर 1961 मध्ये करण्यात आली होती.

50 मेगाटन 5 कोटी टन परंपरागत स्फोटकांच्या एवढी रशियाच्या या अणुबॉम्बची ताकद असून रशियाने हा अणुबॉम्ब विमानातून आर्टिक समुद्रातील नोवाया जेमल्यावरील मोठ्या बर्फावर टाकला होता. या अणुबॉम्बबाबत जेव्हा पश्चिमेकडील देशांना सुगावा लागला तेव्हा ‘Tsar Bomba’ असे या बॉम्बचे नाव ठेवण्यात आले.

यासंदर्भातील 30 मिनिटांची डॉक्युमेंट्री रशियाची रोस्तम स्टेट अॅटोमिक एनर्जी कॉर्पोरेशनने आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केली असून या अणुबॉम्बची दाहकता एवढी होती की त्याच्या परीक्षणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी जे विमानांच्या सहाय्याने कॅमेरे लावण्यात आले होते, ती विमाने त्या ठिकाणाहून शेकडो किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर ते लो लाईट पोझिशनवर ठेवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांनी या आगीच्या अजस्त्र गोळ्याचा 40 सेकंदांचा व्हिडीओ कैद केला आहे.

अणुबॉम्बच्या परीक्षणानंतर त्याच्या धुराचे लोळ उठले, ते तब्बल दोन लाखांहून अधिक फूट उंचावर गेले होते. रशियाने 6 दशके या परीक्षणाचा व्हिडीओ टॉप सिक्रेट म्हणून ठेवला होता. नुकतीच रोस्तमला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जगाला ताकद दाखविण्यासाठी हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

या अणुबॉम्बला रशियन सैन्याने RDS-220 नाव दिले होते. जगातील सर्वात मोठा असा हा अणुबॉम्ब आहे. अमेरिकेच्या थर्मोन्‍यूक्लियर डिवाइसला टक्कर देण्यासाठी सोव्हिएत संघाने हा बॉम्ब बनविला होता. अमेरिकेने 1954 मध्ये थर्मोन्‍यूक्लियर बॉम्बची चाचणी घेतली होती. पण त्याची शक्ती ही 15 मेगाटन होती. त्यावेळेस थर्मोन्‍यूक्लियर बॉम्ब सर्वात शक्तीशाली होता.

Nuclear Vault

रेल्वेने ओलेन्‍या एअरबेसवर हा अणुबॉम्ब रशियाने नेल्यानंतर तो एका लांब पल्ल्याचा मारा करू शकणाऱ्या Tu-95 बॉम्बर विमानाला जोडण्यात आला. 600 मैलाचा प्रवास करून या विमानाने आर्टिक समुद्रात हा अणुबॉम्ब फेकला होता. अणुबॉम्बला पॅराशूट जोडलेले असल्यामुळे तो अणुबॉम्ब एवढ्या धीम्यागतीने बर्फावर आदळला की तोपर्यंत विमान अणुबॉम्बच्या कक्षेतून बाहेर पडले होते. हा अणुबॉम्ब जवळपास 13,000 फूट उंचीवरून टाकण्यात आला होता.