पुण्यात ऑक्सफर्ड-सिरमच्या लसीचा डोस दिलेल्या ‘त्या’ दोन्ही स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम


पुणे – पुण्यातील सिरम आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने एकत्रितपणे विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची देशातील पहिली मानवी चाचणी कालपासून पुण्यात सुरु झाली असून कालपासून ऑक्सफर्ड-सिरमने पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत.

या लसीचा ०.५ एमएलचा पहिला डोस काल दोन स्वयंसेवकांना देण्यात आला. डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत कोरोना लसीचा डोस दिला. त्यांना हा डोस आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतरच देण्यात आला. हे डोस ऑक्सफर्ड-सिरम लसीच्या फेज २ चाचणीतंर्गत देण्यात आले. ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यासाठी पुढे आलेल्या दोन स्वयंसेवकांची तब्येत ही ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे चांगली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

३२ आणि ४८ वयोगटातील दोन स्वयंसेवकांना पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस देण्यात आला. भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे नाव ‘कोविशिल्ड’ आहे. एक महिन्यानंतर या लसीचा पुन्हा दुसरा डोस दोन्ही स्वयंसेवकांना दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे वैद्यकीय उपसंचालक डॉ. जितेंद्र ओस्वाल यांनी सांगितले की, आमची वैद्यकीय कालपासून टीम दोन्ही स्वयंसेवकांच्या संपर्कात आहे. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. त्यांना कुठेही वेदना होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा ताप नाही. दोन्ही स्वयंसेवकांचे बुधवारी लस दिल्यानंतर अर्धा तास परीक्षण करण्यात आल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

काही गरज पडल्यास त्यांना इमर्जन्सीमध्ये नंबर देण्यात आले आहेत तसेच आमचे वैद्यकीय पथकही त्यांच्या संपर्कात आहे असे डॉ. जितेंद्र ओस्वाल म्हणाले. काल पाच जणांवर लस चाचणी करण्यात येणार होती. पण तिघांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्यामुळे ते या चाचणीसाठी पात्र ठरले नाही.

Loading RSS Feed