भाजपची घोषणा; नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढवणार बिहार विधानसभा निवडणूक


नवी दिल्ली – बिहारमधील सर्वच राजकीय पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले असून भाजप प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठकही या दरम्यान पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा देखील या बैठकीत सहभाग होता. आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा यावेळी नड्डा यांनी केली.

नड्डा यांनी बैठकीत सांगितले की, जेव्हा जेव्हा भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी एकत्र आले, तेव्हा विजय आपलाच झाला आहे. ही निवडणूक आपण तिन्ही पक्ष मिळून लढवणार व विजयी होणार आहोत. भाजपबरोबरच एनडीएतील सहकारी पक्ष असलेले जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीचा देखील निवडणुकीत विजयी होतील. तसेच, ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

नड्डा यावेळी विरोधी पक्षावर निशाणा साधत म्हणाले की, बिहार व देशातील विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून, केवळ पोकळ राजकारण विरोधी पक्षाकडून केले जात आहे. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या-छोट्या बैठका आयोजित करून प्रचार सुरू करण्याचेही आवाहन नड्डा यांनी केले. तसेच, घरोघरी जाऊन नितीश कुमार यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यास देखील त्यांनी सांगितले.

जेपी नड्डा म्हणाले की, सध्या बिहारमध्ये लॉकडाउन असल्यामुळे ६ सप्टेंबरनंतर आपण बिहारला नक्कीच जाणार आहोत. आपल्या सहकारी पक्षांना देखील भाजपला विजयी करायचे आहे, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना यासाठी देखील जोर लावावा लागणार आहे. कोरोना काळात निवडणूक होत असल्याने हे एक मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.