‘कोव्हिशिल्ड’च्या उपलब्धतेविषयीचे वृत्त सीरम इन्स्टिट्यूटने फेटाळले


पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लस शोधून काढली असून, काही माध्यमांनी त्या लसीच्या उपलब्धतेविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. सीरम इन्स्टिट्यूटने त्या वृत्ताचे खंडण केले आहे. काही माध्यमांनी ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या उपलब्धतेविषयी जे वृत्त दिले आहे, ते खोटे असून, अंदाजाने दिलेले असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशासमोर मोठे संकट उभे केले असून, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच त्यावर प्रतिबंधक लस शोधण्याचे काम सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटला यात यश आले असून, सध्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या चाचण्या सुरू आहेत. पण, काही माध्यमांनी चाचण्या सुरू असतानाच ही लस ७३ दिवसांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे वृत्त दिले होते. सीरम इन्स्टिट्यूटने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

सीरमने ७३ दिवसांत कोरोनावर लस उपलब्ध होणार असल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांमध्ये सध्या ‘कोव्हिशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. केंद्र सरकारने आम्हाला सध्या फक्त लस तयार करण्याची परवानगी आणि भविष्यातील वापरासाठी ती साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. कोव्हिशिल्डच्या सर्व चाचण्या एकदा यशस्वी झाल्या आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही लस विक्रीसाठी उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड-अँस्ट्राजेनेका लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस रोगप्रतिकारक आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट त्यांच्या उपलब्धतेविषयी अधिकृतपणे माहिती देईल, असे सीरमने म्हटले आहे.