राज ठाकरेंनंतर आता सुप्रिया सुळेदेखील जिम सुरु करण्यासाठी आग्रही


मुंबई : कोरोनाच्या दुष्ट संकटाने राज्यात अक्षरशः थैमान घातले असून सरकारने लॉकडाउनची घोषणा होण्याच्या आधीपासूनच राज्यातील जीम, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनलॉक – 2 सुरू झाल्यानंतर जीम सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारकडे जीम सुरू करण्याबाबतची मागणी केली आहे.

याबाबत ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला एका जीम चालकाचे पत्र पाठवले आहे. राज्यातील जीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. पण, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याचे स्पष्ट मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे. जीम मालकाने या पत्रात आपल्या अडचणीचा पाढाच वाचला आहे. जीम मार्च महिन्यांपासून बंद आहे. आम्ही जेवढी बचत केली होती. ती आतापर्यंत वापरली. आता बँकेचे हफ्ते, वीज बिल, जागेचे भाडे देणे अशक्य झाले आहे. जीम बंद असली तरी भाडे आणि विज बिल भरावेच लागत आहे. आमच्यावर आता भीक मागण्याची वेळ आली आहे, अशी व्यथा जीम मालकांने मांडली आहे.

जीम चालकांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी, जर राज्यातील दारूचे दुकाने, मॉल उघडली जात असेल तर जीम उघडण्यास अडचण काय आहे. तुम्ही जीम उघडा, ज्यांना यायचे ते येतील, बाकी पाहून घेऊ, असे आश्वासन राज ठाकरेंनी दिले होते. दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जीम सुरू करावे अशी मागणी केली होती.